लहान मुलांना गोष्टी का सांगाव्यात ॽ

                                         

“ ज्ञान अथवा बोध मिळेल तेवढेच सांगावे व तेवढेच ऐकावे अशा केवळ व्यापारी धोरणावर गोष्टी सांगणे आम्हाला पसंत नाही.निव्वळ मनाचा आनंद,मौज, हास्य, विनोद यांनाही जीवनात महत्त्वाचे स्थान आहे.म्हणून शिक्षणातही ते असले पाहीजे.किंबहुना गोष्टी ऐकण्यात यांनाच स्थान मिळाले पाहिजे.”

 – ताराबाई मोडक (गोष्टी सांगणाऱ्यांस चार गोष्टी)

               

  आपल्याकडे ‘गोष्टी सांगण्याची’फार मोठी परंपरा आहे.पिढ्यानपिढ्या सांगितल्या जात असलेल्या लोककथांनी मनोरंजनाबरोबर समाजशिक्षणाचंही काम केलं.संतांनी आपल्या किर्तनं,प्रवचनांमधून गोष्टी सांगितल्या.त्यामधून त्यांनी समाजप्रबोधन केलं.लोकांना प्रेरणा दिली, धीर दिला.आजी-आजोबांकडे तर गोष्टींचा खजिनाच असायचा त्यामुळे नातवंडांचा त्यांच्याभोवती सदैव गराडा पडलेला असायचा.आपणही गोष्टी ऐकतच लहानाचे मोठे झालो.औद्योगीकीकरणानंतर समाजव्यवस्था,कुटुंबव्यवस्था बदलत गेली. मनोरंजनाची इतर साधने हाताशी आली.त्यात गोष्टी माहीत असणारे,सांगणारेही फारसे उरले नाहीत.त्यामुळे गोष्ट सांगण्याची ही परंपरा आज क्षीण होताना दिसत आहे.खरे तर लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत,अगदी जगभरातील सर्वांनाच गोष्टी ऐकायला,वाचायला,सांगायला आवडतात.आज रेडिओ,मोबाईल,टीव्ही अशा वेगवेगळया माध्यमांद्वारेही मुलांना गोष्टीं ऐकवल्या अथवा दाखविल्या जातात पण प्रत्यक्ष गोष्ट ऐकण्यातली मजा काही वेगळीच असते.घरात किंवा शाळेत लहान मुलांना नियमीतपणे गोष्टी ऐकवणे मुलांच्या भाषाविकासाठी आणि साक्षरतेच्या विकासासाठी फायदेशीर ठरते असे या क्षेत्रातल्या तज्ञांना वाटते.लहान मुलांना गोष्ट सांगण्याचे कोणकोणते फायदे होतात हे आपण या लेखात पाहणार आहोत.

            गोष्टी वगळून आपल्या जीवनाची कल्पना करणे जवळजवळ अशक्य आहे ! तसे केले, तर आपल्या जीवनातला गाभाभूत असा भागच उणावल्यासारखे होईल,रंगहीन जग किंवा चवहीन अन्न अशासारखेच ते होईल.लहान मुले असोत वा मोठी माणसे, आपण कुठल्या ना कुठल्या प्रकारच्या गोष्टी सांगतो आणि ऐकतो.हजारो वर्षे हे चालू आहे. माणसाला माणूस बनवण्यात गोष्टींचा मोठा वाटा आहे.चित्र आणि शब्द,हावभाव, कृती यांचा वापर करून गोष्टी सांगितल्या जातात. बाहुल्या, छायाबाहुल्या, मुखवटे,नृत्य, चित्रे, मूर्ती यांचा वापर करून,विविध दृक-माध्यमांच्या द्वारा गोष्टी सांगण्याच्या समृद्ध परंपरा भारतात आहेत.                 
            -जेन साही (भाषा आणि कला:मराठी रूपांतर: वर्षा सहस्त्रबुद्धे,क्वेस्ट करीता)   

गोष्टीतून मुलांना आनंद मिळतो:

मुलांना गोष्टी ऐकायला आवडतात,त्यात त्यांना मजा वाटते.गोष्टी मुलांचे निखळ मनोरंजन करतात.केवळ या एकाच उद्देशासाठी मुलांना गोष्टी सांगितल्या पाहिजेत. बालशिक्षणतज्ञ ताराबाई मोडक ‘ गोष्टी सांगणाऱ्यांसाठी चार गोष्टी ’ या त्यांच्या लेखात गोष्टींतून मुलांना केवळ आनंदच मिळायला हवा असं ठासून सांगतात.इतर अनेक उदि्दष्टे आपसूकच साध्य होतात. गोष्टींत मजा असते,आनंद मिळतो ही गोष्ट मुलांना एकदा का कळाली की गोष्टींबरोबरचे त्यांचे नाते अधिक घट्ट होते.

श्रवणक्षमतेचा विकास :

 चला,आज मी तुम्हाला एक गोsष्ट सांगणार आहे.वर्गातल्या ताईंच्या तोंडून असं वाक्य बाहेर पडलं तर काय घडेल? सगळी मुलं आपलं काम टाकून पटकन ताईंकडे लक्ष देतील.तुम्हालाही असा अनुभव आला असेल.गोष्टी मुलांचे लक्ष वेधून घेतात.अगदी चंचल मुलंही एका जागी स्थीर बसून गोष्ट ऐकतात त्यातून मुलांची ऐकून घेण्याची बैठक वाढते. एकाग्रता वाढते.मुख्य म्हणजे ऐकून समजून घेण्याच्या क्षमतेचा विकास होतो.पुढे मूल स्वतंत्रपणे वाचत असताना मजकूराचा अर्थ समजून घेण्यासाठी ही क्षमता कामी येते.गुंतागुंतीची भाषा समजून घेतात. कृष्णकुमार त्यांच्या लेखात असे म्हणतात की,चांगला श्रोता कोण असतो?तोच जो शेवटपर्यंत ऐकत राहील.आता ऐकणं हे एक कौशल्य मात्र उरलेलं नाही.उलट ते आता एक रिवाज बनलं आहे.याला प्रोत्साहन देण्यासाठी म्हणून उच्च स्तरावर प्रशिक्षणं आयोजित केली जात आहेत.गोष्ट सांगण्याने एका निर्णायक काळात धीराने ऐकण्याची सवय लागते.पुढे हीच सवय जीवनाचा एक भाग बनून जाते.

तोंडी भाषेचा विकास :

शालेय शिक्षणात तोंडी भाषेचा वापर करण्याचे कौशल्य अत्यंत महत्त्वाचे ठरते. लहानमुलांसमोर तोंडी भाषा भरपूर बोलली गेली पाहिजे.मोठयांसोबत झालेल्या आंतरक्रियेतून मुलांचा भाषा शिकण्याचा वेग वाढतो असे भाषातज्ञ म्हणतात,त्यासाठी मुलांना गोष्टी सांगणे हे अत्यंत उपयुक्त साधन आहे मुलांना नवनीन शब्दांची ओळख होते. असे शब्द समजून घेण्याचा,त्यांचे उच्चार आत्मसात करण्याचा मुले प्रयत्न करतात. वाक्यरचना, विशेषणे,क्रियापदे , म्हणी,वाकप्रचार यांचा वापर कसा केला जातो हे कळते. मुख्य म्हणजे भाषा कशी वापरली जाते हे मुलांना समजायला मदत होते.त्यासाठी भाषेचा संपन्नतेने उपयोग  करून घेता यायला हवा.सर्जनशील पद्धतीने भाषा वळवता,वाकवता येते.अशी उदाहरणे मुलांसमोर जाणीवपूर्वक ठेवता आली पाहीजे. मुलांचे भाषेवर प्रभुत्त्व नसेल तर शब्दसंपदा वाढविणे,मजकुराचा अर्थ रचणे या प्रक्रीया मुलांना कठीण जातात.गोष्टी सांगण्यादरम्यान अशा खूप जागा असतात की,जिथे चांगली चर्चा घडवून आणता येते.मुले मोकळेपणाने बोलू शकतात.आपला अनुभव गोष्टीतील आशयाशी जोडू शकतात.ऐकलेली गोष्ट त्यांनाही इतरांना सांगायची असते.गोष्टीचा सारांश लक्षात ठेवून स्वत:च्या भाषेत गोष्ट सांगायचा प्रयत्न करतात.ही गोष्ट सांगताना मुले आपले अनुकरण करण्याचा प्रयत्न करतात.

माहिती मिळते,परिसराची ओळख होते:

गोष्टी वेगवेगळया काळांमध्ये घडलेल्या असतात.त्या वेगवेगळया ठिकाणी घडतात.गोष्टी ऐकताना मुलांचे मन गोष्टीतल्या प्रसंगामागे,पात्रांमागे धावू लागते.आपण स्वत:च्या आयुष्यात कधीही न पाहिलेल्याही अनेक गोष्टी असतात. मुलांना गोष्टींच्या माध्यमातून इतिहास कळतो,भूगोल समजतो.माहिती मिळते.परीसराची ओळख होते त्याबद्दल कुतूहल निर्माण होते. मुलांचे भावविश्व समृद्ध होते.त्या त्या काळातील लोकजीवन कसे होते?हे समजते.आपल्यापेक्षा वेगळया असलेल्या समाजाचा, त्यांच्या जीवनशैलीचा, संस्कृतीचा परीचय होतो.आपण आपली त्यांच्याबरोबर तुलना करून पाहतो.या साऱ्यांमुळे आपला परीघ विस्तारायला मदत होते.

भावनिक विकास :  

मुलांच्या भावनिक बुद्धिमत्तेचा विकासासाठी गोष्टींचा उपयोग होवू शकतो. अमेरीकन मनोविश्लेशनतज्ञ ब्रुनो बैटनहाईम त्यांच्या The uses of enchantment पुस्तकात ते असे सांगतात की,मुलांच्या भावनिक विकासासाठी त्यांना नियमीत परीकथा ऐकवल्या पाहिजेत.मुले गोष्टीतील पात्रांच्या भावभावना समजून घेण्याचा प्रयत्न करतात.स्वत:ला त्या पात्रांच्या ठिकाणी कल्पून विचार करतात.इतरांच्या भावभावना समजून घ्यायला शिकतात.गोष्टीतून मुलांना वेगवेगळया मानसिक प्रक्रीयांचा अनुभव मिळतो. वंचीत,दुबळ्या,उपेक्षीत घटकांप्रती अधिक संवेदनशील बनतात. पात्रांबद्दलचे पूर्वग्रह दूर व्हायला मदत होते.कठीण परिस्थीतीवर मात करणारा साहसी,इतरांना मदत करणारा कथानायक मुलांना प्रेरीत करतो. अचानक उद्भवलेल्या संकटाचा धीरोदत्तपणे कसा सामना करायचा?हे समजते.

सहअनुभूती घडते :  

गोष्टी मुलांना संमोहीत करतात. गोष्ट ऐकताना मुले गोष्टीतील पात्राशी एकरूप होतात.स्वत: त्या गोष्टीचा भाग बनतात. ही एकप्रकारची सहअनुभूती घडून येत असते. मुलांना जे अनुभव प्रत्यक्ष अनुभवता आले नाहीत ते गोष्टीतील पात्रांच्या माध्यमातून अनुभवण्याची  संधी त्यांना मिळते. स्वत:च्या कल्पनेत ती हरवून जातात. एकदा पहिलीच्या वर्गात गोष्ट सांगताना असाच अनुभव आला होता. मुलांना ‘उंदराला सापडली पेन्सिल’ही वी.सुतेयेव या रशीयन लेखकाची गोष्ट वाचून दाखवत होतो.या गोष्टीत उंदराला पेन्सील सापडते आणि तो ती कुरतडणार असतो. कारण त्याला त्याचे दात धारदार बनवायचे असतात.मरणाच्या तावडीत सापडलेली पेन्सील शेवटचं चित्र काढण्याची अंतीम ईच्‍छा उंदराकडे व्यक्त करते. पेन्सील मांजराचे चित्र काढते. मांजर पाहून उंदीर घाबरून पळून जातो.अशी ही गोष्ट आहे. गोष्ट वाचून दाखवल्यावर मुलांसोबत पोस्ट ॲक्टीव्हीटीवर चर्चा करताना, शाळेच्या धान्यकोठीत किंवा घरातील उंदरांना आपणही मांजराचे चित्र लावून पळवून लावू या असे ठरले.दुसऱ्या  दिवशी ठरल्याप्रमाणे आढावा घेताना,मांजराचे चित्र पाहून तुमच्या घरातील उंदीर पळून गेले काॽ असे विचारले. बहुतांशी मुलांनी ‘हो’ असे उत्तर दिले. त्यांच्या या उत्तरामुळे मी चकीत होण्याचा किंवा ते पडताळून पाहण्याची आवश्यकता मला वाटली नव्हती. ही त्या साहित्याने केलेली किमया होती. मुलं आता गोष्टीचा भाग बनली होती हे मला नेमके उमजले होते.कधी कधी मुलांच्या अशा कल्पना वास्तवाच्या धगीत जळून जातात.मुलांच्या त्यांच्या कल्पनेत रमू द्यायला हवे. या कल्पनांचा आपण मोठयांनी आदर केला पाहीजे. मुलांच्या या कल्पनाविश्वाला,सर्जनाला शिक्षणात अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे.कृष्णकुमारांच्या एका लेखामधून मला ती दृष्टी मिळाली होती.

कल्पकता व कल्पनाशक्तीचा विकास :

मुले गोष्ट ऐकताना गोष्टींच्या पात्रांशी प्रसंगाशी एकरूप होतात.गोष्टीतील स्थळ,काळ, प्रसंगाचे चित्र त्यांच्या डोळयासमोर उभे राहत असते. कधीही न पाहिलेल्या गोष्टीही कल्पनेने निर्माण करण्याचं सामर्थ्या मुलांमध्ये असते.मुलांच्या गोष्टीत माणसे , प्राणी,पक्षी, यांच्याबरोबरच  राक्षस,पऱ्या,भुते,बागुलबुआ,जादुगार अशी असंख्य काल्पनिक पात्रेही असतात. ही सारी पात्रे माणसांसारखीच वागतात, बोलतात. अशाप्रकारे कल्पनेने जग निर्माण करण्याच्या क्षमतेला गोष्टी ऐकण्यातून चालना मिळते.ज्ञानापेक्षा कल्पनाशक्ती महत्त्वाची असते व मुलांना बुद्धिमान बनवायचे असेल तर त्यांना परीकथा ऐकवा असे थोर शास्त्रज्ञ अल्बर्ट आईनस्टाईन सांगतात.मुले एखादया निर्जीव वस्तुतही प्राण फुंकून त्याला जिवंत करत असतात.मुलांचे बाहूलीघर किंवा भातुकलीचा खेळ हे याचे  उत्तम उदाहरण आहे. मुले झोपताना,जेवत असताना त्यांच्या हाती मोबाईल देण्याऐवजी गोष्टी ऐकवल्या तर ते निश्चीतच अधिक फायदेशीर ठरेल.ॲनिमेटेड व्हिडीओच्या माध्यमातून तयारकर्त्यांच्या कल्पनेतले  कृत्रीम जग दाखवून मुलांच्या कल्पनांचे पंख कशाला छाटायचे. थोडयाशा खतपाण्याने स्वत:ची गोष्ट निर्माण करण्यापर्यंत मुले मजल मारू शकतात असा आपल्या अनेकांचा अनुभव आहे. गोष्टीचा शेवट बदलणे,गोष्ट ऐकल्यावर गोष्टीवर आधारीत चित्रे काढणे,पात्रे बदलून पाहणे.पात्राची मुलाखत घेणे. अशा काही उपक्रमांतून  नवनिर्मीतीची असंख्य दारे आपण खुली करू शकतो.

अंदाजकौशल्य विकसीत होते:

गोष्ट मुलांच्यात कुतूहल  प्रेरित करते.गोष्टीत जेव्हा एखादया निर्णायक ठिकाणी विराम दिल्यावर , आता पुढे काय होणार ? याची  उत्सुकता लागून राहते.मुलांना तसा प्रश्न ‍विचारून आपण अंदाज बांधण्याची संधी देवू शकतो. मुलांनी सांगितलेल्या अंदाज बरोबर ठरले की चुकीचे हे पडताळून पाहता येते.आपला अंदाज  बरोबर ठरल्यावर मुलांना खूप आनंद होतो.खरे तर हा आनंदच त्याला ‍ मिळालेलं बक्षीस असते.यातून मुलांना अंदाजकौशल्य कसे वापरावयाचे याचे प्रशिक्षण मिळते. हे अंदाजबांधण्याचे कौशल्य गणित आणि विज्ञानासारख्या विषयांत आणि रोजच्या जगण्यात अनेक ठिकाणी वापरावे लागते.शिक्षणातील  ते एक मुलभूत कौशल्य आहे.

गोष्टीदरम्यानच्या संवादाचे महत्त्व :

गोष्ट सांगताना गोष्ट सांगणारी व्यक्ती व ऐकणारी मुले समसमान पातळीवर येवून काम करत असतात.अशा वेळी मोठे व लहान यांच्यात एकप्रकारची भावनिक जवळीकता निर्माण होण्यास मदत होते.गोष्ट सांगणारा मुलांना काय सांगायचे आहे ते ऐकून घेत असतो. त्यामुळे मी मोकळेपणाने बोलतात.मुलांना आपले म्हणणे मांडण्याची, गोष्टीतील प्रसंगाला स्वत:चा अनुभव जोडण्याची संधी मिळते.खरे तर अशा सकस आंतरक्रियांमधून शिक्षण घडत असतं. योग्य जागी मुलांना विचारप्रवृत्त करणारे प्रश्न विचारून गोष्टीविषयी अधिक खोलवर समज निर्माण करता येते.मुलांना प्रश्न विचारण्याची सवय लागते.रेडिओ किंवा इतर माध्यमांदवारे गोष्ट ऐकवणे हे एकांगी असल्याने गोष्टीदरम्यान चर्चा घडवून आणता येत नाही.प्रत्यक्ष गोष्ट सांगण्यातला हा सर्वात मोठा फायदा आहे.

          नियमीतपणे गोष्टी सांगण्याच्या उपक्रमातून मनानं अस्थीर असलेलं, शाळेला  धजावलेले,शाळेच्या औपचारीक वातावरणात बावरलेलं मूल शाळेत टिकून राहयला मदत होते. गोष्टीच्या माध्यमातून मुलांच्या भावविश्वात डोकावण्यासाठी नामी  संधी मिळते. आपलं मुलांशी नातं अधिक घटट होण्यास मदत होते.म्हणून तर शाळेमध्ये गोष्टी सांगणारा शिक्षक सर्वांत जास्त लाडका असतो.काही ठिकाणी मुलांची घरची भाषा शाळेच्या भाषेपेक्षा वेगळी असते. मुलांना सुरूवातीला शाळेतील भाषेशी जुळवून घ्यायला अवघड जातं. आम्हांलाही भटक्या विमुक्त जाती जमातीतील मुलांसोबत काम करत असताना असा अनुभव नेहमीच येतो.अशा वेळी गोष्टीच्या तासाला कधी मुलांची भाषा,कधी घरची शाळेची समिश्र भाषा वापरून,कधी शाळेच्या भाषेचा अंदाज घेत गोष्ट पुढेपुढे सरकत जाते.घरची भाषा आणि शाळेची भाषा यांच्या पूल बांधण्याचं काम गोष्टी करू शकतात.मुलांना त्यांच्या भाषेतील,लोककथा सांगण्याची संधी मिळाल्याने त्यांचे हे संचीत शाळेत जमा होतं.पूर्वतयारी,नियोजन आणि थोड्याशा सरावाने आपण गोष्टी सांगण्याची कला आत्मसात करू शकतो.अगदी कोणताही खर्च नसलेले हे तंत्र चोरीला जाण्याची तर मुळीच भीती नाही. युरोपमध्ये मूलांना रात्री झोपताना गोष्ट सांगण्याचा व वाचून दाखवण्याचा परिपाठ निष्ठेने पाळला जातो. गोष्टींत रमलेली ही मुले पुढे वाचती झाल्यावर पुस्तकांमधल्या लिखीत गोष्टींकडे आपसूकच खेचली जातील.लिपी,रंग,रेषांच्या माध्यमातले गोष्टींचे नवे विश्वच त्यांच्यासाठी खुले होते त्यातून अर्थ निर्माण करण्यासाठी आवश्यक असणारी पायाभरणी गोष्टींमधून होत असते .

                                                 

 संदर्भ –

  • लेख: कहानी कहाँ खो गई : कृष्णकुमार,शैक्षणिक संदर्भ
  • लेख : शिक्षा के क्षेत्र में कहानियोंका महत्त्व:संजय गुलाटी,शैक्षणिक संदर्भ
  • लेख : कहानी सुनाने का हुनर:कृष्णकुमार:शैक्षणिक संदर्भ
  • लेख: गोष्टी सांगणाऱ्यांसाठी चार गोष्टी:ताराबाई मोडक
  • लेख: लोककथा आणि समाजजीवन :संजीवनी कुलकर्णी:पालकनीती दीवाळी अंक २०१९
  • लेख: बालवयातील भाषा आणि साक्षरता:शैलजा मेनन:मराठी अनुवाद : अनुपमा  जोशी,नीलेश  नीमकर 
  • मुलांची भाषा आणि शिक्षक :कृष्णकुमार: मराठी अनुवाद – वर्षा सहस्त्रबुद्धे 
  • फारूक एस.काझी (बालसाहित्यीक व प्राथ.शिक्षक)यांच्यासोबत झालेल्या चर्चा
  • Article:The power of storytelling to young learners: Mutiarani,Lidiyatul  Izzah
  • अप्रकाशीत टिपण:जेन साही :भाषा आणि कला,मराठी रूपांतर :वर्षा सहस्त्रबुद्धे,क्वेस्टकरीता

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s